टाकवे बुद्रुकमध्ये ARAI कंपनीला परवानगीवर ग्रामस्थांचा विरोध
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याची ठाम मागणी; अटींशिवाय NOC नको
टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : येथील ARAI (Automotive Research Association of India)कंपनीला ‘न हरकत’ (NOC) परवानगी देण्याबाबत आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. कंपनीकडून विविध प्रकारच्या परवानग्या मागविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिकांच्या हिताचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशी एकमुखी भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली.
ग्रामसभेत नागरिक, युवकांनी सहभाग नोंदवत कंपनीविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. औद्योगिक विकासास विरोध नसला तरी तो स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणारा नसावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांनी कंपनीसमोर विविध मागण्या ठेवल्या. त्यामध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये किमान ३० ते ४० टक्के प्राधान्य देणे, गावातील महिला बचत गटांना कॅन्टीन व इतर सेवा कंत्राटे देणे, CSR निधीतून जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच गावात सुसज्ज आरोग्य केंद्र किंवा फिरता दवाखाना उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
तसेच, गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर कोणताही परिणाम होणार नाही याची हमी देत कंपनीने स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP/ETP) उभारावा, कंपनी परिसरातील रस्त्यांची जबाबदारी घ्यावी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून सौर दिवे बसवावेत, तसेच युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, अशा ठोस मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की, या सर्व मागण्यांबाबत लेखी हमी व अंमलबजावणीचा आराखडा सादर केल्याशिवाय ARAI कंपनीला ‘न हरकत’ परवानगी देऊ नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, ग्रामसभेतील या भूमिकेमुळे संबंधित प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रशासनाने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या ग्रामसभेत ग्रामपंचायत पदाधिकारी कंपनीचे प्रतिनिधी व ग्रामस्थ युवक उपस्थितीत होते.



