मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत भोयरे गाव दत्तक; जि.प. सदस्य अनंतभाऊ पावशे यांची तात्काळ भेट
भोयरे गावाच्या विकासाला मिळणार बुस्टर डोस

मावळ : पुणे जिल्हा परिषद पुणे येथील विद्यमान सदस्य मा. अनंतभाऊ पावशे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत मावळ तालुक्यातील भोयरे गाव दत्तक घेतले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी गावाला तात्काळ भेट देत ग्रामविकासाच्या कामांचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून विविध विकासकामांबाबत मार्गदर्शन केले.
गाव दत्तक घेतल्यानंतर अनंतभाऊ पावशे यांनी भोयरे गावात भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी गावातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, तसेच शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधणे, गाव स्वयंपूर्ण करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा मुख्य उद्देश असल्याचे पावशे यांनी सांगितले. भोयरे गाव विकासाच्या दृष्टीने आदर्श बनविण्यासाठी आवश्यक त्या योजना राबविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले.
या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अनंतभाऊ पावशे यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी उपसभापती अमोल भोईरकर, भोयरे ग्रामसेविका डावरे मॅडम, माजी सरपंच राजेश कोकाटे, माजी सरपंच बाळासाहेब पावशे आदीजण उपस्थितीत होते गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. गाव दत्तक घेतल्यामुळे भोयरे गावाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



