प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी; वनवासी विद्यार्थ्यांना ‘बॉर्डर २’ चित्रपटाची मेजवानी

तळेगाव दाभाडे (दि. २६) – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य आणि ऋग्वेदा रोहित गिरमे हिच्या वाढदिवसानिमित्त गिरमे कुटुंबाच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत वडगाव मावळ येथील ‘गोपाळ नवजीवन केंद्राच्या कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहा’तील मुलांसाठी ‘बॉर्डर २’ या देशभक्तीपर चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव दाभाडे येथील श्री शिवाजी टॉकीज येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक संदीप भास्करराव म्हाळसकर, प्रसिद्ध उद्योजक संकेत सतीश खळदे आणि वसतिगृह व्यवस्थापक सोमनाथ वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
शौर्य आणि राष्ट्रप्रेमाचा जागर
तरुण पिढीमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. केवळ मनोरंजनच नव्हे, तर देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाची माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली.
मान्यवरांकडून कौतुक
यावेळी बोलताना मान्यवरांनी गिरमे कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. वाढदिवसाचा खर्च अनावश्यक बाबींवर न करता, तो सामाजिक कार्यात आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी खर्च केल्याबद्दल गिरमे कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले. या विशेष शोसाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



