
वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विशाल वहिले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरण्याची किमया साधली आहे. त्यांच्या या विजयाची सध्या संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. विशेषतः प्रभाग क्रमांक ६ मधील लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. माजी नगराध्यक्ष आणि दिग्गज उमेदवार समोर असतानाही विशाल वहिले यांनी अत्यंत संयमी आणि नियोजनबद्ध प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला. भाजपने दिलेल्या संधीचे सोनं करत वहिले यांनी विजयश्री खेचून आणली.
• ‘वहिले पॅटर्न’ ठरला यशस्वी
विशाल वहिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी आता थेट नगरपंचायतीत नगरसेवक म्हणून दमदार पाऊल टाकले आहे.यापुर्वी पत्नी पुजा वहीले यांनी नगरसेवक व उपनगराध्यक्ष पद भुषविले होते मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास आणि प्रभाग क्रमांक ६ मध्ये राबवलेला ‘वहिले पॅटर्न’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
• गटनेतेपदासाठी प्रबळ दावेदार?
एका माजी नगराध्यक्षाचा पराभव करून निवडून आल्यामुळे विशाल वहिले यांचे पक्षातील आणि शहरातील वजन वाढले आहे. त्यांच्या या ‘विशाल’ विजयानंतर आता नगरपंचायतीमध्ये गटनेतेपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून, लवकरच त्यांना ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



