राजेश खांडभोर यांची पुणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती
शिवसेना शिंदे गटाचे विश्वासू व संघटक कार्यकर्ते म्हणून कामगिरीची दखल
टाकवे बुद्रुक (मावळ) :
शिवसेना शिंदे गटाचे मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांची प्रभारी पुणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीपत्र देत ही निवड जाहीर केली.
खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून खांडभोर यांची ओळख असून, पडत्या काळातही त्यांनी मावळ तालुक्यात पक्षाचा झेंडा गावोगावी फडकवला. सर्वांना सामावून घेणारा उत्तम संघटक व सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ह्याच कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना खांडभोर म्हणाले, “खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारत असून पक्षाचे विचार ताकदीने पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर राहीन. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आभारी आहे.”



