दिलेला शब्द खरा ठरला! अश्विनीताई कोंडे (असवले)यांच्याकडून ‘वचनपूर्ती
टाकवे गणातील महिलांना घडले साडेतीन शक्तीपीठांपैकी एका 'सप्तशृंगी मातेचे' दर्शन

टाकवे बुद्रुक (विशेष प्रतिनिधी) – राजकारणात आश्वासने अनेक दिली जातात, पण दिलेला शब्द तोही ‘निवडणुकीच्या पलीकडे जाऊन’ पाळणे, हीच खरी निष्ठावंत लोकप्रतिनिधीची ओळख असते. टाकवे पंचायत समिती गणातील शिवसेना (शिंदे गट) अधिकृत उमेदवार सौ. अश्विनीताई सोमनाथ कोंडे (असवले) यांनी याचाच प्रत्यय देत, चार गावातील उर्वरित महिलांना रविवारी नाशिकच्या वणी गडावर नेऊन ‘सप्तशृंगी देवीच्या’ दर्शनाचा लाभ मिळवून दिला.
काही दिवसांपूर्वी टाकवे पंचायत समिती गणातील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नियोजनातील काही तांत्रिक कारणास्तव त्या वेळी गणातील चार गावांमधील महिलांना या यात्रेचा लाभ घेता आला नव्हता. त्यावेळी काहीशा नाराज झालेल्या या भगिनींना अश्विनीताईंनी, “तुम्हाला देवीच्या दर्शनाला नेणारच, हा माझा शब्द आहे,” असे आश्वासन दिले होते.
तोच शब्द प्रमाण मानून, रविवारी अश्विनीताईंनी या चारही गावातील शेकडो महिलांसाठी खास बसेसची व्यवस्था करत त्यांना वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनास नेले. गडावर पोहोचताच महिलांनी ‘सप्तशृंगी मातेचा उदो उदो’ करत भक्तिभावाने दर्शन घेतले. संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःसाठी वेळ न मिळणाऱ्या महिलांना, या यात्रेच्या निमित्ताने एक विरंगुळा तर मिळालाच, पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नेत्याची ‘वचनपूर्ती’ देखील अनुभवायला मिळाली.
यावेळी बोलताना महिलांनी सांगितले की, “अश्विनीताईंनी फक्त राजकारण केले नाही, तर आमच्या श्रद्धेचा मान राखला. त्यांनी दिलेला शब्द पाळल्याने आमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर दुप्पट झाला आहे.” अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात ही यात्रा यशस्वीरीत्या संपन्न झाली..



