मुंबईत महायुतीचा मावळ फॉर्म्युला ठरला!

मुंबई : मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग येत असताना महायुतीकडून महत्वाचा राजकीय फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत झालेल्या खास बैठकीत लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे तर तळेगाव दाभाडे नगरपरिषद Bharatiya Janata Party कडे राहणार असल्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीस आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा नेते गणेश भेगडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
मावळमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर यशस्वी झाल्या आहेत. नगरपरिषदांच्या सत्तासंरचनेसंदर्भात निर्माण झालेला तणाव आणि दोन्ही गटांच्या आकांक्षा लक्षात घेऊन अध्यक्षपद आणि सत्ता वाटपाचा समन्वय साधण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार तळेगाव नगरपरिषदेत भाजपचे नेतृत्व राहणार असून राष्ट्रवादीला उपनेतृत्व आणि महत्वाच्या स्थायी समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधीत्व मिळणार आहे. तर लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहील आणि भाजपकडून सहकार्य व पाठिंबा दिला जाईल यासह वडगाव नगरपंचायतीचा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी घेणार माहिती समोर आली आहे
या निर्णयानंतर आता मावळ तालुक्यात निवडणूकपूर्व संघर्षाऐवजी सहमतीचा मार्ग स्वीकारला गेल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यासाठी या बैठकीत नेमके धोरण निश्चित करण्यात आले. आगामी काळात प्रचार, शहर विकास योजना, निधी नियोजन आणि प्रभाग रचनेबाबत संयुक्त रणनीती तयार केली जाणार आहे.
बैठकीनंतर दोन्ही पक्षांचे नेते आशावादी दिसत होते. “मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार हा मार्ग असून राजकारणाचे केंद्रबिंदू नागरिकांची कामे असावीत,” असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. तर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी, “तळेगाव शहराच्या विकासासाठी मोठे प्रकल्प राबविण्याचा संकल्प असून भाजप आणि राष्ट्रवादी मिळून शहराला नवीन दिशा देणार,” असे सांगितले.
या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरणात स्थिरता येण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवरील गणितावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार उमेदवार निश्चिती आणि प्रचारयोजनांवर पक्ष रणनीती आखणार आहेत.



