मावळपुणेसांप्रदायिक

टाकवे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा ‘हीरक महोत्सव’; १६ जानेवारीपासून भक्तीचा जागर!

Spread the love

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील धार्मिक वारसा जपणारे मौजे टाकवे बुद्रुक येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ६० वे वर्ष (हीरक महोत्सव) असून, या निमित्ताने गावात १६ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आधुनिक काळात सात्विकता आणि सहनशीलता वृद्धिंगत व्हावी, तसेच गाव निरपेक्ष, सर्वंग संस्कारक्षम आणि बलशाली बनावे, या उदात्त हेतूने गेली ५९ वर्षे ही परंपरा अविरत सुरू आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ (पौष कृ. १२) रोजी होणार असून, सांगता शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ (वसंत पंचमी) रोजी होणार आहे.

 

सप्ताहादरम्यान दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा रुजू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:

 * १६ जाने: ह.भ.प. माऊली महाराज साबळे (आळंदी)

 * १७ जाने: ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव (सातारा)

 * १८ जाने: ह.भ.प. उद्धव महाराज सबलस (वडुले बु., शेवगाव)

 * १९ जाने: ह.भ.प. पुंडलिक महाराज नागवडे (शिरूर)

 * २० जाने: ह.भ.प. संग्रामबापू महाराज भंडारे (आळंदी)

 * २१ जाने: ह.भ.प. पांडुरंग महाराज साळुंखे (सांगली)

 * २२ जाने: ह.भ.प. सय्यद महाराज जलाल (करंजीकर)

 * २३ जाने: ह.भ.प. नितीन महाराज काकडे (तळेगाव दा.) – काल्याचे कीर्तन (सकाळी ९ ते ११).

तसेच दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ह.भ.प. अशोक महाराज जाधव, ह.भ.प. घनश्याम महाराज पडवळ, ह.भ.प. गुलाब महाराज कुंभार यांसारख्या मान्यवरांची प्रवचन सेवा लाभणार आहे.

सप्ताहातील प्रत्येक दिवस भक्तीभावाने भारलेला असणार आहे. पहाटे ४ वाजता काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर विष्णुसहस्रनाम, सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी नेमाचे भजन, हरिपाठ, प्रवचन आणि रात्री हरिकीर्तन असा भरगच्च कार्यक्रम असेल. रात्री १० नंतर हरिजागर देखील होणार आहे.

गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत गावातून भव्य ‘दिंडी प्रदक्षिणा सोहळा’ पार पडणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक बंधू-भगिनींनी या हीरक महोत्सवी सोहळ्यास उपस्थित राहून श्रवणसुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ टाकवे बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button