केअरिंग हॅण्डस्’ संस्थेचा दशकपूर्ती गौरव सोहळा ७ जानेवारीला; प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे यांचे विशेष व्याख्यान

मावळ (प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवेचा वसा घेतलेल्या ‘केअरिंग हॅण्डस्’ (Caring Hands) या नामांकित संस्थेचा १० वा वर्धापन दिन अर्थात ‘दशकपूर्ती गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता आंबी येथील कलाश्रम प्रकल्प येथे हा सोहळा पार पडणार आहे.
गेल्या १० वर्षांपासून अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या ‘केअरिंग हॅण्डस्’ संस्थेच्या या प्रेरणादायी प्रवासाचा साक्षीदार होण्याची संधी मावळवासियांना मिळणार आहे. या विशेष प्रसंगी प्रसिद्ध शिवचरित्रकार, प्रख्यात व्याख्याते आणि लेखक माननीय प्रा. नितीनजी बानुगडे यांचे ‘प्रेरणादायी व्याख्यान’ आयोजित करण्यात आले आहे. आपल्या ओघवत्या वाणीने आणि ऐतिहासिक दाखल्यांनी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगरूळ रोड, आंबी गाव (ता. मावळ, पुणे) येथील ‘कलाश्रम प्रकल्प’ येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. संस्थेच्या या दशकपूर्ती सोहळ्यात सहभागी होऊन संस्थेच्या कार्याला बळ देण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. “आपली उपस्थिती हीच आमची ऊर्जा आहे,” अशा भावना संस्थेने व्यक्त केल्या आहेत.



