लोणावळा-तळेगाव नगरपरिषद व वडगाव-देहू नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
प्रत्येक्ष मतदान २ डिसेंबरला, मतमोजणी ३ डिसेंबरला
मावळ – लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव व देहू नगरपंचायत यांच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात मोठी चुरस, हालचाल व रणनीती सुरू झाली असून पक्ष, गट आणि स्वतंत्र उमेदवारांकडून संघटनात्मक तयारी, जनसंपर्क तसेच आंतरिक चर्चांचा वेग वाढला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर अधिकृत प्रचार मोहीमेचा जोर वाढणार आहे.
मुख्य मतदान २ डिसेंबर रोजी होत असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. यानुसार नव्या नगरपरिषद व नगरपंचायत पदाधिका-यांची सरशी याच दिवशी निश्चित होणार आहे.
स्थानिक राजकारणात ‘महत्त्वाची लढत’
लोणावळा व तळेगाव हे मावळ तालुक्यातील पर्यटन, उद्योग व शिक्षणामुळे वेगाने वाढणारे शहरभाग आहेत. येथील नगरपरिषद निर्णयांचा शहराच्या विकासावर थेट परिणाम होत असल्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. मागील निवडणुकीत लोणावळा तळेगाव नगरपरिषदेत भाजप ची सत्ता होती तर वडगाव व देहु येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती
वडगाव व देहू नगरपंचायत भागातही स्थानिक प्रभागातील समस्या, पाणी, रस्ते, स्वच्छता व ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सोयींवर निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्टीकोनातून महत्वाच्या असलेल्या देहूत विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची मुद्दा तर वडगावमध्ये वाहतूक कोंडी व शहर विस्तार नियोजन हे प्रमुख मुद्दे राहण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारांची धावपळ सुरू
कार्यक्रम जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी जनसंपर्क, समर्थक बैठका, कागदपत्रांची तयारी तसेच पक्षांतर्गत चर्चा वाढविली आहे. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता व स्थानिक मतदार समीकरणांवर आधारित नवीन आघाड्या निर्माण होण्याची शक्यता रंगू लागली आहे.
मतदारांमध्ये उत्सुकता
पर्यटन सुविधा, स्वच्छता अभियान, वाहतूक व्यवस्थापन या प्रश्नांवर मतदार आता अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ पक्ष विरुद्ध पक्ष न राहता ‘कामगिरी’ विरुद्ध ‘पर्याय’ अशी होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.दरम्यान, निवडणूक आयोगाने शांतता कालावधी, आचारसंहिता आणि मतदार नोंदणी बाबतही सूचना जारी केल्या असून सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२ डिसेंबरला लोकशाहीचा उत्सव साजरा होणार असून त्याचे निकाल ३ डिसेंबरला स्पष्ट होतील



