शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात ‘कांब्रे’ जिल्हा परिषद शाळेचा डंका; विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी!

Spread the love

वडगाव मावळ – मावळ पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित ‘यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५-२६’ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा कांब्रे (ना. मा.) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. लोकनृत्य आणि वक्तृत्व स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावत आपली वर्चस्व सिद्ध केले आहे.

या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेत शाळेच्या मोठ्या गटाने आदिवासी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली आणि स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वक्तृत्व स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली. यामध्ये लहान गटातून आर्यन निलेश गायकवाड (इयत्ता ३ री) याने, तर मोठ्या गटातून कुमारी दर्शना सचिन दाभाणे (इयत्ता ६ वी) हिने प्रथम क्रमांक मिळवला.

क्रीडा प्रकारातही शाळेने यश मिळवले असून, धावती उंच उडी प्रकारात कुमारी मानसी भगवान गायकवाड हिने तृतीय क्रमांक संपादन केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना मावळ तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. शिल्पा रेउगे मॅडम, विस्तार अधिकारी श्री. सुदाम वाळुंज साहेब आणि केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र भांगरे यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब ओव्हाळ आणि सर्व शिक्षक वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गायकवाड, सदस्या सौ. रेखाताई गायकवाड व सौ. कमल गायकवाड यांचे विशेष सहकार्य या कामी मिळाले.

शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल ग्रुप ग्रामपंचायत कांबे (ना. मा.) चे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button