पिंपरी चिंचवडमावळराजकीय

ठरलं! तळेगाव नगरपरिषदेत महायुती – संतोष दाभाडे व गणेश काकडे यांना अडीच-अडीच वर्षे नगराध्यक्षपद

वडगाव, लोणावळा मध्ये महायुती होणार कार्यकर्त्यांचे लक्ष

Spread the love

 

   तळेगाव दाभाडे – आगामी तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अधिकृतपणे महायुती जाहीर झाली आहे. या महायुतीची रचना, नगराध्यक्षपदाचे वाटप व पुढील राजकीय समीकरणे या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तळेगाव दाभाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके यांच्यासह दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले की नगरपरिषदेत सत्ता रोटेशन पद्धतीने वाटली जाणार असून पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्याकडे राहणार आहे. यानंतर उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गणेश काकडे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नगराध्यक्षपदाबरोबरच नगरपरिषद स्थापनेतील २७ नगरसेवकांच्या उमेदवारीची अंतिम यादी मात्र आज जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रदेशस्तरीय प्रमुख नेत्यांची उद्या मुंबई येथे बैठक होणार असून तेथे सामंजस्याने उमेदवारीबाबतची अंतिम यादी निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असेही नेत्यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील राजकारणात या महायुतीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून तळेगाव नगरपरिषदेत सत्तास्थापनेवरून विविध राजकीय संघर्ष पहावयास मिळाले. मात्र यावेळी एकाच ताकदीने विकासाची गाडी पुढे नेण्यासाठी महायुतीचे हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगत होते. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंधपणे विना-विरोध काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या निवडणुकीत महायुतीमुळे नगरपरिषदेत नव्या समीकरणांची निर्मिती होणार असून विरोधकांसमोर ही मोठी राजकीय आव्हानात्मक लढत उभी राहणार आहे. दरम्यान स्थानिक नागरिक, व्यावसायिक व सामाजिक संस्थांकडून या निर्णयावर उत्सुकतेने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून पुढील दोनच दिवसांत नगरपरिषद निवडणूक राजकारणाचा नेमका कल अधिक स्पष्ट होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button