वडगाव नगरपंचायत निवडणूकीत प्रभाग 16 मधील अपक्ष उमेदवार सायली म्हाळसकर यांचे पारडे जड ; विकासकामांचा ठसा ठळक
.

वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असताना प्रभाग क्रमांक 16 मध्ये अपक्ष उमेदवार सायली रुपेश म्हाळसकर यांचे पारडे अधिकाधिक जड होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. स्थानिक स्तरावर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, मागील कार्यकाळातील ठोस विकासकामे आणि घराघरात पोहोचणारा जनसंपर्क यांच्या जोरावर सायली म्हाळसकर प्रभागातील मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, पुढे काही काळ उपनगराध्यक्ष या जबाबदारीची उल्लेखनीयपणे पूर्तता सायली म्हाळसकर यांनी केली होती. या कार्यकाळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेली कामांची मालिका नगरपंचायतच्या इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहे. प्रभागातील प्रमुख रस्त्यांचे सुसज्ज डांबरीकरण, काँक्रीट रस्त्यांची उभारणी, ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा, स्वच्छ जलपुरवठा, आधुनिक प्रकाश व्यवस्था, धोकादायक वीजतारा अंडरग्राउंड करण्याची मोठी कामे अशा अनेक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली.
याशिवाय मुलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित खेळाचे मैदान उभारून प्रभागातील लहान मुलांच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलला. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत केलेली ही कामे आजही मतदारांच्या लक्षात असून, त्यावर त्यांनी सायली म्हाळसकर यांना उच्च श्रेणीचे गुण दिले आहेत. निवडून आल्यास प्रभागातील उर्वरित प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन विकासाचा वेग वाढविणार असल्याचेही म्हाळसकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग 16 मध्ये सायली म्हाळसकर यांच्या वाढत्या लोकप्रियतेमागे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष व त्यांचे पती रुपेश म्हाळसकर यांचा भक्कम जनसंपर्क हा एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेला सातत्यपूर्ण संवाद, लोकांशी असलेली जवळीक आणि विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याच्या जोरावर घराघरात घट्ट पकड निर्माण केली आहे. या जनसंपर्काचा थेट लाभ सायली म्हाळसकर यांना मिळत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
प्रभागातील महिलांमध्ये सायली म्हाळसकर यांचा विशेष असा वैयक्तिक संपर्क हा त्यांच्या प्रचाराचा आणखी एक मजबूत आधार आहे. महिला मतदारांशी दररोज होणारा संवाद, त्यांच्या अडचणी समजून घेऊन केलेल्या उपाययोजना, तसेच प्रभागातील महिला मंडळांना दिलेला पाठिंबा यामुळे त्यांना महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिलांचा हा विश्वास व पाठिंबा आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाचा निर्णायक घटक ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचेही मत आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक 16 मध्ये सध्या निवडणुकीची लढत अधिकाधिक रंगतदार बनत असली तरी सायली म्हाळसकर यांच्या बाजूने निर्माण झालेली सकारात्मक लाट, विकासकामांचा मजबूत पाया आणि प्रभागातील सर्व स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे त्यांचे पारडे सध्या जड झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आगामी काही दिवसांतही या प्रचाराचा वेग कायम राहिला, तर प्रभाग 16 मध्ये सायली म्हाळसकर हे नक्कीच सर्वाधिक चर्चेचे आणि आघाडीचे उमेदवार ठरण्याची चिन्हे आहेत.
“प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिकांनी मला दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे. गेल्या कार्यकाळात आपण दिलेल्या सहकार्यामुळेच प्रभागात रस्ते, ड्रेनेज, अंडरग्राउंड वीजतारा, प्रकाशव्यवस्था, खेळाचे मैदान अशी अनेक महत्वपूर्ण विकासकामे पूर्ण करता आली. माझा एकच उद्देश आहे—‘सतत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक विकास’.निवडून आल्यास प्रभागातील प्रलंबित कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन अधिक सुशोभित, सुरक्षित आणि प्रगत प्रभाग घडविण्यासाठी मी अखंड प्रयत्न करणार आहे. प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक आणि विशेषतः महिलांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. आगामी निवडणुकीतही आपण असेच सहकार्य आणि आशीर्वाद द्यावा, ही नम्र विनंती.”
– सायली रुपेश म्हाळसकर ,अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 16