मी जे बोलतोय ते खोटं असेल तर 24 तासात पुढे या!” “आम्ही त्यांना मान दिला, जबाबदारी दिली, तरी शेवटी केसाने गळा कापण्याचे काम झाले,”

वडगाव मावळ- मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, उमेदवार यादी जाहीर करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रशांत भागवत आणि त्यांच्या पत्नी मेघाताई प्रशांत भागवत यांनी अचानक राजीनामा देत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रवेशानंतर “आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून भाजपमध्ये गेलो,” असा आरोप प्रशांत भागवतांकडून केला जात असताना, आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत संपूर्ण घटनाक्रम उघड करत “मी जे बोलतोय ते सत्य नसेल तर 24 तासांच्या आत पुढे येऊन सांगा,” असे थेट आव्हान दिले.
सुनील शेळके यांनी सांगितले की, प्रशांत भागवतांना जानेवारी 2025 मध्ये—म्हणजेच सुमारे एक वर्षापूर्वी—स्वतः आणि गणेश भाऊ खांडगे यांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची तयारी करण्यासाठी प्रवृत्त केले होते. ओबीसी आरक्षण पडल्यास उमेदवार तयार असावा म्हणून त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले, पद देऊन ओळख निर्माण करून दिली गेली आणि त्यांची राजकीय तयारी सुरू करण्यात आली. सुरुवातीला “ओबीसी पुरुष जागा आल्यास प्रशांत भागवत, सर्वसाधारण पुरुष जागा आल्यास विठ्ठल शिंदे आणि सर्वसाधारण महिला जागा आल्यास पहिली संधी पल्लवी दाभाडे यांना,” अशी प्राथमिक भूमिका चर्चेत होती. याच पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्षांनी संबंधित इच्छुक उमेदवारांना तयारी व प्रचार दौरे सुरू ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सर्वांनी आपापला प्रचार दौरा सुरू केला होता.
दरम्यान, दाभाडे परिवाराकडून पल्लवी दाभाडे यांच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त करण्यात आली होती आणि त्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर हालचालीही सुरू झाल्या होत्या. आरक्षण सोडत होताच सर्वसाधारण महिला जागा निश्चित झाल्यानंतर पल्लवी दाभाडे यांना त्या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता बळावली. त्यानंतरच प्रशांत भागवत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मेघाताई भागवत यांची उमेदवारी पक्षाकडे मागितल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे आरक्षण सोडत होण्यापूर्वी प्रशांत भागवतांकडून त्या जागेसंदर्भात कोणतीही ठोस इच्छा व्यक्त करण्यात आलेली नव्हती, मात्र सोडत झाल्यानंतर त्यांनी थेट उमेदवारीची मागणी मांडल्याचा दावा शेळकेंनी केला.
शेळके यांनी पुढे सांगितले की, पक्षाने परिस्थितीचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मेघाताई भागवत यांना पंचायत समिती सदस्य पद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्या वेळी प्रशांत भागवत यांनी पक्षाकडे काही अटी व मागण्या ठेवल्याचा आरोप शेळके यांनी केला. त्यांच्या मते, प्रशांत भागवत यांनी सर्वात आधी माळवाडीतील इच्छुक उमेदवार सुनील नाना भोंगाडे यांची उमेदवारी थांबवावी, अशी अट मांडली. त्यानंतर दुसरी अट म्हणून दिलीप ढोरे यांची उमेदवारीदेखील थांबवावी, अशी मागणी केली. यासोबतच भाजपमधील इच्छुक उमेदवार संदीप काशीद यांनी नातेवाईक व प्रभावाच्या जोरावर उमेदवारी अर्ज दाखल करू नये, त्यांची उमेदवारीही रोखण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केल्याचे शेळके यांनी सांगितले.
इतकेच नव्हे, तर “मी पंचायत समिती स्वीकारतोय, तर मेघाताईंना पहिल्या दीड वर्षासाठी सभापती पद मिळाले पाहिजे,” अशी अटही भागवत यांनी ठेवली असल्याचे शेळकेंनी सांगितले. याचबरोबर “मला जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी,” अशी मागणीही त्यांनी मांडल्याचा दावा करण्यात आला. पुढे “मी उपसभापती होईन आणि माझ्या पत्नी मेघाताईंना जिल्हा परिषदेत स्वीकृत मधून अडीच वर्षांसाठी संधी देण्यात यावी,” अशी शेवटची मागणीही ठेवण्यात आली होती. आमदार शेळके यांनी दावा केला की, पक्षाने त्या काळात परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत त्यांना मान्यता दिली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीबाबत काही चर्चा सुरू असतानाही भाजपसोबतच्या आधीच्या नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांतील अनुभव ‘वाईट’ असल्याने या वेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असा निर्णय झाल्याचे शेळके यांनी सांगितले.लोणावळा या ठिकाणी युतीचा गैरफायदा घेत भाजपने जागांच्या बाबतीत भूमिका बदलली, ठरलेले निर्णय मागे घेतले आणि युतीतील विश्वास तोडला, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व माऊली भाऊ दाभाडे यांना मानणाऱ्या गटासोबत चर्चा करून उमेदवारीचे गणित जुळवत पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती जागांसाठी ताकदीने उतरायचे ठरवले, असेही ते म्हणाले.
या सर्व चर्चेनंतरही पत्रकार परिषद सुरू असतानाच प्रशांत भागवतांनी राजीनामाचे पत्र देऊन जाणे आणि त्यानंतर तासाभरात भाजपमध्ये प्रवेश करणे हा नियोजित राजकीय डाव असल्याचा संशय शेळके यांनी व्यक्त केला. “आम्ही त्यांना मान दिला, जबाबदारी दिली, तरी शेवटी केसाने गळा कापण्याचे काम झाले,” असा थेट आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, भागवत कुटुंबियांनी आमच्यावर अन्याय झाल्याचा प्रचार सुरू केला असून तो खोटा असल्याचे सांगत शेळके यांनी “मी जे बोलतोय ते खोटं असेल तर 24 तासांच्या आत पुढे येऊन सत्य सांगावे,” असे जाहीर आव्हान दिले.
आमदार शेळके यांनी आणखी एक मोठी घोषणा करत सांगितले की, जर प्रशांत भागवत यांनी ठोसपणे सांगितले की आमच्यावर अन्याय झाला आणि सुनील शेळके खोटे बोलत आहेत, तर राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये बदल करूनही न्याय देण्याची तयारी आहे. “पल्लवीताई दाभाडे यांची उमेदवारी माघारी घ्यायला लावण्याची जबाबदारी मी घेतो, पण बदनामीचा खोटा खेळ केला तर घराघरात जाऊन आम्ही काय दिलं आणि त्यांनी काय घेतलं हे जनतेसमोर मांडू,” असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची लढाई वेगाने रंगत असताना, या घडामोडींमुळे मावळ तालुक्यात राजकारण अधिकच तापले असून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



