कुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी मौलाली तालमीला अर्थिक मदतीचा हात
टाकवे पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे यांचा उपक्रम

टाकवे बुद्रुक – टाकवे परिसरातील पारंपारिक कुस्ती संस्कृतीला बळकटी मिळावी व स्थानिक पैलवानांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टाकवे पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार अश्विनी सोमनाथ कोंडे यांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. टाकवे येथील मौलाली तालीममध्ये सध्या १०० पेक्षा अधिक कुस्तीपटू नियमित सराव करीत असून, तालमीच्या दुरुस्तीबाबत काही आवश्यक साहित्य व सुविधा अपुऱ्या असल्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. या परिस्थितीची दखल घेऊन कोंडे यांनी तालमीच्या विकासासाठी मदत करत सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकट केली.
टाकवे व आसपासच्या गावांमध्ये पिढ्यानपिढ्या कुस्तीचा वारसा जोपासला जातो. अनेक तरुणांनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली आहे. मात्र उपलब्ध साधनसामग्रीची मर्यादा, कुस्ती सरावासाठी योग्य मातीची कमतरता, तालीमगृहाच्या छत व भिंतींची दुरवस्था अशा समस्या पुढे येत होत्या. कोंडे यांनी या समस्यांची माहिती घेतली आवश्यक असलेली आर्थिक मदत त्वरित दिली.
या मदतीतून तालीमगृहाची माती बदलणे, पंखे व प्रकाशयंत्रे बसविणे तसेच काही व्यायाम साधनांची उपलब्धता करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या काळात सराव अधिक प्रमाणात व व्यावसायिक पद्धतीने आयोजित करता येईल अशी अपेक्षा तालीम व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
या प्रसंगी अश्विनी कोंडे म्हणाल्या, “कुस्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. गावातील तरुणांनी खेळ क्षेत्रात मोठं यश संपादन करावं हीच इच्छा. त्यांना सुविधा देणे हे आपलं कर्तव्य आहे. येथील पैलवानांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”
पैलवान, प्रशिक्षक आणि गावातील नागरिकांनीही या मदतीचे स्वागत केले. “अश्विनी ताईंनी दिलेली मदत ही फक्त आर्थिक मदत नसून खेळाडूंना मिळालेली नैतिक प्रेरणा आहे. त्यामुळे सराव अधिक जोमाने होईल,” अशी प्रतिक्रिया मावळ तालुका कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष ऋषीनाथ शिंदे यांनी दिली
टाकवे परिसरात खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही कृती युवा पिढीत उत्साह निर्माण करणारी ठरली आहे. आगामी काळात कुस्तीपटूंच्या प्रगतीसाठी आणखी सुविधा वाढवण्याची मागणी आता पुढे येत असून,टाकवे गावात आंदर मावळातील पैलवानांना करीता पाच गुंठे जागेत सुसज्ज तालीम व्हावी यासाठी समाज व स्थानिक नेतृत्व हातात हात घालून पुढील पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



