मावळ

मावळमध्ये धर्मवीर बलिदान मासाला प्रारंभ; युवकांकडून त्याग, श्रद्धा आणि स्वाभिमानाचा प्रेरणादायी संदेश

टाकवेतील युवक - युवतीचा वाढता सहभाग

Spread the love

टाकवे बुद्रुक: मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये युवकांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ ‘धर्मवीर बलिदान मास’ भावपूर्ण वातावरणात पाळण्यास सुरुवात झाली आहे. १८ फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत हा बलिदान मास साजरा करण्यात येत असून, हा काळ सुतकाचा (दुखवट्याचा) महिना म्हणून श्रद्धा आणि आदराने पाळला जात आहे.

टाकवे गावातील युवकांना कडून या दिवसांमध्ये ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र,व श्लोकाचे वाचन एकत्रितपणे मंदिरात करतात या बलिदान मासाच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्याग, शौर्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण ठेवण्याचा संकल्प केला आहे. संभाजी महाराजांनी अमानुष छळ सहन करतानाही धर्म आणि स्वराज्याशी तडजोड केली नाही. त्यांच्या या महान बलिदानामुळेच हिंदवी स्वराज्याची ज्योत अखंड तेजाने प्रज्वलित राहिली, अशी भावना युवकांनी व्यक्त केली.

बलिदान मासाच्या काळात अत्यंत साधेपणाने जीवन जगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या काळात गोड पदार्थांचा त्याग, चप्पल न घालणे, जमिनीवर झोपणे, तसेच काही युवकांकडून मुंडन करून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. या कृतींमधून महाराजांच्या बलिदानाची जाणीव जपण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

युवकांनी सांगितले की, बलिदान मास हा केवळ परंपरा नसून, तो त्याग, सहनशीलता आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी काळ आहे. या माध्यमातून नव्या पिढीला संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास समजून घेता येतो आणि राष्ट्रनिष्ठा व स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होते.

मावळ तालुक्यातील युवकांनी मोठ्या श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा बलिदान मास पाळण्याचा निर्धार व्यक्त केला असून, संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सशक्त प्रयत्न ठरत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button