टाकवे जिल्हा परिषद गटासाठी भाजपची खेळी निर्णायक; मधुकर कोकाटे यांना उमेदवारी जाहीर

टाकवे बुद्रुक | प्रतिनिधी – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, टाकवे जिल्हा परिषद गट काबीज करण्यासाठी बेलज येथील ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते व मावळ तालुका ट्रायबल फोरमचे तालुकाध्यक्ष मधुकर कोकाटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मधुकर कोकाटे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विशेषतः आदिवासी समाजात त्यांचा मजबूत जनाधार असून, समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी प्रभावी भूमिका मांडली आहे. टाकवे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले विकासाभिमुख काम, ग्रामस्तरावरील प्रशासनातील अनुभव आणि लोकांशी असलेला थेट संवाद हे त्यांच्या जमेचे महत्त्वाचे पैलू मानले जात आहेत.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला केवळ दोन मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यावेळी पक्षाने अधिक सावध व रणनीतीपूर्ण पवित्रा घेत, लोकांमध्ये विश्वास असलेल्या उमेदवाराची निवड केली असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत चूक टाळत विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने भाजपकडून आखणीपूर्वक मोर्चेबांधणी सुरू आहे.
सध्या उमेदवार मधुकर कोकाटे गावोगावी भेटी देत जनतेशी संवाद साधत असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे व भविष्यातील आराखडा मांडण्यावर भर देत आहेत. त्यामुळे टाकवे जिल्हा परिषद गटातील ही लढत अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, भाजपने टाकवे गटात निर्णायक पाऊल टाकल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



