करंजगाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम! कर भरा आणि जिंका LED टीव्ही, मिक्सरसह आकर्षक बक्षिसे;
'गावचा हिरो' बनण्याची ग्रामस्थांना सुवर्णसंधी

करंजगाव – गावाचा विकास साधण्यासाठी आणि १००% कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मावळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजगाव यांनी एक कौतुकास्पद आणि अभिनव पाऊल उचलले आहे. ग्रामस्थांनी आपला चालू आणि थकीत कर वेळेत भरावा, यासाठी ग्रामपंचायतीने ‘भव्य लकी ड्रॉ योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना आकर्षक गृहोपयोगी वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.
काय आहे ‘लकी ड्रॉ’ योजना?
३१ डिसेंबर २०२५ ही कर भरण्याची अंतिम तारीख असून, तोपर्यंत कर जमा करणाऱ्यांसाठी युवा उद्योजक श्री. विनायक तानाजीभाऊ पोटफोडे यांच्या सौजन्याने भरघोस बक्षिसे ठेवली आहेत. यामध्ये एलईडी टीव्ही (LED TV), मिक्सर, फॅन, डिनर सेट, हॉट किटली, कुकर, इस्त्री आणि साड्या यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.
‘कर भरा आणि गावचा हिरो बना‘
केवळ बक्षिसे देऊन न थांबता, ग्रामपंचायतीने “कर भरा, गावचा हिरो बना” ही अनोखी संकल्पना मांडली आहे.
• गावचा हिरो सन्मान: लकी ड्रॉ मधून निवडल्या जाणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला ‘गावचा हिरो’ म्हणून घोषित केले जाईल. त्यांचा विशेष सन्मान करून फोटो व नाव ग्रामपंचायत कार्यालयात लावले जाईल.
• पर्यावरण पूरक दृष्टिकोन: ‘तुमचा कर, आमचे १ झाड’ या तत्त्वावर करदात्याच्या नावाने वृक्षारोपण करून भविष्यातील ऑक्सिजनची तरतूद केली जाणार आहे.
स्पर्धेत निमित्ताने विशेष आकर्षणे
• सेल्फी पॉईंट: ग्रामपंचायत कार्यालयासमोर “I Paid My Tax” हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
• कर चॅम्पियन किड्स पुरस्कार: जे घर कर भरेल, त्या घरातील मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
• कर योगदान सन्मान: वर्षभर नियमितपणे कर भरणाऱ्या घरांना ग्रामपंचायत प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सन्मान देणार आहे.
पारदर्शकता आणि योग्य नियोजन
कर वसुलीत पारदर्शकता रहावी यासाठी नियमित कर भरणारे आणि थकबाकीदार यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नियमित कर भरणारे आणि थकीत कर आता भरलेले अशा सर्वांसाठी २ स्वतंत्र लकी ड्रॉ आणि एक संयुक्त लकी ड्रॉ काढला जाईल.या उपक्रमाचे आयोजन सरपंच सौ. उज्वला संदीप पोटफोडे, उपसरपंच श्री. महादू सिधु शेडगे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. चंद्रकांत मोरे यांनी केले आहे.
लकी ड्रॉ निकाल कधी?
या भव्य लकी ड्रॉचा निकाल प्रजासत्ताक दिनी, म्हणजेच सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३ वाजता ग्रुप ग्रामपंचायत करंजगाव कार्यालय येथे जाहीर केला जाईल. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपली थकबाकी भरून या योजनेचा लाभ घ्यावा व गावच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
